E - Pass News Update

मुख्य उत्सव - चैत्र यात्रा

Yamai devi temple

चैत्र यात्रा

floral

चैत्र पौर्णिमेस दरवर्षी एप्रिल मध्ये जोतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे सहा-सात लाख भाविक या यात्रेसाठी येतात. या वेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहभान हरपून, 'चां S S ग भलं' च्या एकच जयघोषात जोतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एकच जयघोषाने दुमदुमून जातो. गुलालाची उधळण, खोबऱ्याची पाखरण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सारे 'उत्सव दृश्य' अगदीच अनोखे असते. या दिवशी श्रींचा शासकीय महाभिषेक पहाटे ५ ते ६ या वेळेत होतो व महावस्त्रासह महापूजा ७ ते ८ या वेळेत होते. तसेच सकाळी १० ते १२ या वेळेत धुपारतीसह पंचारती होते. दुपारी एकच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी सासनकाठ्या हलगी, पिपाणी, सनईच्या सुरांवर नाचविल्या जातात. सासनकाठी म्हणजे शेंड्याला तुरा व ध्वजपताका असलेला सुमारे तीस ते पन्नास फूट उंचीचा वजनदार वेळू! त्यावर तळामध्ये जोतिबाचे वाहन 'घोडा' बसवलेला असतो. जोतिबावर मनाच्या ९६ सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. सासनकाठ्यांशिवाय हात्ती, उंट, तोफागाडी, व भालदार, चोपदारांचा लवाजमा हे या यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात. त्यानंतर पाठोपाठ सायंकाळी पाचच्या सुमारास विधिपूर्वक पूजाविधी झाल्यावर श्री जोतिबाची उत्सवमूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते. यमाई देवी हि जोतिबाची बहीण! याच दिवशी सूर्यास्तानंतर, यमाई देवी शिक्के-कट्यारशी (जमदग्नीशी) विवाहबद्ध होते. हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो. यानिमित्त श्री जोतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात व विवाहानंतर माघारी परत येतात. यावेळी विविध धार्मिक विधी होतात व नयनरम्य आतषबाजी करण्यात येते. चैत्र पौर्णिमेची यात्रा हि सुमारे महिनाभर म्हणजे पाखाळणीपर्यंत चालते. चैत्र यात्रेनंतर पाच रविवार जी यात्रा भरते त्या यात्रेस 'पाखाळणी' असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळाले नाही ते पाखाळणीस येऊन पालखी व शिखरांवर गुलाल-खोबरे टाकून दर्शन घेऊन परतात.

महोत्सवाची झलक

सन्मानित सासन काठीचे महत्त्व:

Sasan khati

सासनकाठी हि चैत्र यात्रेच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक होय. सुमारे ३० ते ४० फूट उंचीचे जाड निशाण, त्यावर तळामध्ये बसवलेले जोतिबाचे वाहन 'घोडा' असे या सासनकाठीचे स्वरूप असते. सासनकाठी खांद्यावर घेऊन नाचणे व तोरण्या सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते. दूरवर विखुरलेला जोतिबाचा भक्तवर्ग, पूर्वपरंपरेनुसार आपापल्या भागातील सासनकाठ्या घेऊन जोतिबास बहुतांश प्रमाणात पायी चालत येतो. सोबत बैलगाड्या सुद्धा असतात. सासनकाठी जोतिबाकडे मार्गस्थ होताना रस्त्यात ठिकठिकाणी गावोगावी दर्शनासाठी मोठी गर्दी होते. सुहासिनी महिला निशाणास ओवाळण्यासाठी येतात. भाविक मंडळी निशाणास विविध आकर्षक हार तोरण, नोटांच्या माळा व नारळांची तोरणे अर्पण करतात. यात्रेनिमित्ताने जोतिबा मंदिरात वाजत-गाजत असंख्य सासनकाठ्या येतात, पण त्यापैकी ९५ काठ्या मानाच्या असून त्यांना सरकारच्यावतीने म्हणजेच देवस्थान समितीच्यावतीने क्रमानुसार मानपान दिले जातात. सासनकाठ्यांची 'दंगल' हे चैत्र यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. ज्या गावात सासनकाठ्या आहेत त्या ठिकाणी गुडीपाडव्यास चैत्र यात्रेस येण्यासाठी बैठका होतात. नियोजन करण्यात येते. सासनकाठ्या या जोतिबा चैत्र यात्रेचे वैभव आहे.