E - Pass News Update

जोतिबा मंदिराबद्दल

About Jyotiba

जोतिबाचा इतिहास
floral

श्री जोतिबा अथवा केदारेश्र्वर हे बद्रिकेदारेचेच रूप आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश आणि जमदग्नीचा क्रोधांश या सर्वांचा मिळून एक तेजो:पुंज अवतार म्हणजेच केदारनाथ किंवा जोतिबा! 'जोतिबा' या नावाची उत्पत्ती 'ज्योत' या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश! वायू, तेज, आप (पाणी), आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी 'तेजाचे' शक्तींदैवत म्हणजेच वाडीरत्नागिरी जोतिबा! पौगंड ऋषिंच्या वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्यर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले. बद्रीनाथांनी पौगंड ऋषि या त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टी युक्त सप्तमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाला विमलांबुजेच्या ओंजळीत नाथ, ज्योती रूपात प्रगटले. पुढे विमलांबुजेचा भाव जाणून आठ वर्षाचे बटू म्हणून प्रगटले.


उत्तरेचा देव दक्षिणी आला! :

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला, दैत्यसंहाराच्या संग्रामात सहाय्य करण्यासाठी जोतिबा हिमालयातून दक्षिणेत आला, अशी कथा केदारविजयात दिलेली आहे. 'जोतिबा' हे 'ज्योतिर्लिंग' या नावाने लोकसंस्करण आहे. 'जोतिबाची' मूर्ती चतुर्भुज, हातात खड्ग, डमरू, त्रिशूल अमृतपात्र या आयुधांसह आहे. अश्व हे त्याचे वाहन आहे. धर्मरक्षणार्थ आवतारपुरुष जन्म घेतात, अशी एक समजूत आहे. जोतिबांच्या मागे अशीच पार्श्वभूमी आहे. रत्नासूर आणि कोल्हासूर या राक्षसांनी अनाचार सुरु केला. करवीरवासियांनी या दैत्यांचा त्रास होत असे, म्हणून देवी महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला. तेंव्हा केदारनाथांनी जोतिबांचे रूप घेऊन त्यांचा नायनाट केला. अकरा दिवसांच्या घनघोर संग्रामानंतर श्री जोतिबांनी श्री चर्पटअंबेच्या म्हणजेच चोपडाईच्या साहाय्याने रत्नासुराचा त्रिशुळाने वध केला. तेंव्हा लोकांनी आनंदाने "चां S S ग भलं - चां S S ग भलं " असा एकच जयघोष केला.

मंदिराचा पूर्वइतिहास :

जोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे ते इ.स. १७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुर्नचित करून बांधले. हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसाल्ट दगडात करण्यात आले आहे.

दुसरे केदारेश्वराचे देवालय, विशेष म्हणजे ते खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे. हे मंदिर १५५ वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले. केदारलिंग व केदारेश्वर यामध्ये चर्पटअंबा म्हणचे चोपडाईचे देवालय आहे. ते इ.स. १७५०मध्ये प्रीतीराव चव्हाण, हिंमतबहादूर यांनी बांधले. या तीन देवळांचा एक गट होतो.

चौथे रामेश्वराचे देवालय, हे इ.स. १७८० मध्ये मालजी निकम, पन्हाळकर यांनी बांधले. केदारेश्वरसमोर एका लहानशा चौथऱ्यावर दोन काळ्या दगडात नंदी आहेत. हेही दौलतराव शिंदे यांनी बसविले. देवालयाचे पूर्वेकडील बाहेरील बाजूस सटवाई पूर्वाभिमुख आहे. पश्चिमेस रामलिंग पूर्वाभिमुख आहेत. देवालयाचे भिंतीवर पाच, सहा ठिकाणी वीरगळ दगडही बसविले आहेत.

“श्री केदारनाथाने जोतिबा डोंगराभोवती बारा ज्योतिर्लिंग स्थापन केली म्हणून त्यांना 'ज्योतिर्लिंग' असेही म्हणतात. बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करताना त्यांनी सर्व प्रथम त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणाचे स्मरण म्हणून हिमालयातील केदारेश्वर लिंग स्थापन केले म्हणून त्यांना केदारलिंग असेही म्हणतात.”

जोतिबाचा लवाजमा

floral
Lavajama img

जोतिबाचा लवाजमा : मानाचे उंट घोडे

श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या धार्मिक विधीत उंट, घोडा, हत्ती या मानाच्या प्राण्यांना पूर्वीपासून मोठा मान आहे. पालखी सोहळे, पूजाअर्चा, धुपारती सोहळा यात उंट, घोडा, हत्ती यांचा सहभाग असतो. जोतिबाचे वाहन म्हणून घोड्यास मान आहे. प्रत्येक शनिवारी जोतिबाची घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते. यावेळी मानाचा घोडा मंदिराच्या मुख्य कमानीत ( नावजींची कमान ) पूजा उतरेपर्यंत उभा करण्यात येतो. दर रविवारी दुपारी बारा वाजता व रात्री साडे आठ वाजता निघणाऱ्या पालखी सोहळ्यासमोर हे मानाचे प्राणी सजवून खडे केलेले असतात. जोतिबाच्या चैत्र यात्रेत तर या प्राण्यांवर गुलाल, खोबरे, खारीक यांची प्रचंड उधळण होते.

Lavajama img

श्री जोतिबाचे वस्त्र व अलंकार

श्री जोतिबा देवाची मूर्ती स्थानिक काळ्या पाषाणात घडवलेली असून ती साधारण पणे ४ फूट ३ इंच उंचीची आहे. मूर्ती चतुर्भुज असून क्रमणपद अर्थात डावा पाय किंचीत पुढे टाकलेल्या स्थितीत उभी आहे. उजव्या हातात खड्ग, वर डमरू डावीकडे त्रिशूल आणि खाली अमृत पात्र असून कमरेला पंचा असून गळ्यात कंठहार आहे. माथ्याला नऊ वेटोळ्याची जटा आहे. हातात कडे आणि पायांत तोडे असून कानात नाथपंथी गोल कुंडलं आहेत. दररोज श्रींच्या वस्त्रालंकाराने सालंकृत पूजा बांधल्या जातात. श्रींच्या खड्या पूजेस डोईस मराठेशाही पगडी, बारा बंदी अंगरखा, शेला असा वेश असतो. अंगावर सोन्याचे विविध दागिने असतात. पायात सोन्याचे तोडे, हातांच्या बोटात हिरेजडित अंगठ्या असतात. गळ्यात सोन्याच्या विविध माळा, डोईस शिरपेच असे अलंकार असतात.

Lavajama img

दख्खनच्या राजाला तोफेची सलामी

जोतिबा डोंगरावर महत्त्वाच्या सोहळ्या वेळी तोफेची सलामी दिली जाते. दर रविवार व पौर्णिमेच्या दिवशी पालखी सोहळा होतो. यावेळी रात्री नऊ वाजता तोफेची सलामी दिली जाते. विजया दशमीदिवशी सोने लुटण्याच्या कार्यक्रमावेळी सायंकाळी सहा वाजता पाच वेळा तोफेची सलामी दिली जाते. चैत्र यात्रा काळात मुख्य मंदिराच्या परिसरात दोन वेळा तर यमाई मंदिराच्या परिसरात एक वेळा सलामी दिली जाते. गुढी पाडव्याला पंचांग वाचण्यापूर्वी, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, काळभैरव जयंती या दिवशी तोफची सलामी दिली जाते.

आतील मंदिरे

floral
Nandi

नंदीचे देवालय

जोतिबा मंदिर परिसरात केदारनाथांच्या देवालयाशिवाय इतर काही वैशिष्ट्यपूर्ण अशा मंदिरांचा समूह आहे. यातीलच नंदीचे हे देवालय होय. या मंदिराचे वैशिष्ट्यं असे कि, हे मंदिर दक्षिणाभिमुख आहे. तसेच या ठिकाणी एका ऐवजी दोन नंदी आहेत. हे दोन्ही नंदी काळ्या दगडातील आहेत. असे मंदिर क्वचित ठिकाणीच आढळते. हे मंदिर ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यातील दौलतराव शिंदे यांनी इ. स. १८०८ मध्ये बांधले.

महादेवाचे मंदिर

नंदी मंदिरासमोर महादेवाचे मंदिर दिसते ते उत्तराभिमुख आहे. या मंदिराच्या आतील मंडपाला आधारासाठी एकही खांब नाही. हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात केदारेश्वर, काशी विश्वनाथ ही केदारेश्वर लिंगे आहेत. श्री केदारनाथाने आपल्या भक्तांसाठी या डोंगरावर बारा ज्योतिर्लिंगे स्थापन केली. त्यातील पहिले लिंग म्हणजे केदारनाथ. या लिंगाच्या पूर्वेकडील बाजूस आणखी एक लिंग असून त्यास काशी विश्वनाथ असे म्हणतात. हे मंदिर बांधताना ग्वाल्हेरच्या शिंदे यांनी नर्मदेहून आणलेल्या लिंगाची स्थापना केली. या तीन लिंगांनी स्थापित हे मंदिर अध्यात्मशास्त्र व उत्कृष्ट स्थापत्य कला यांचा एक दुर्मिळ व उत्कृष्ट आविष्कार म्हणता येईल.

MahadevMandir
chopdai devi

चोपडाई देवी मंदिर

श्री महादेव मंदिराला जोडूनच आदिमाया चोपडाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर कलात्मक व वैशिष्ट्यपूर्ण असून देवी पश्चिमाभिमुख उभी आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून केदारेश्वराच्या मंदिरापेक्षा दाक्षिणात्य पद्धतीचे आहे.

शश्री केदारनाथांच्या दक्षिण मोहिमेमध्ये ज्या आदिमाया शक्तींनी केदारनाथांना साह्य केले त्यांतील एक आदिशक्ती चोपडाई देवी ( चर्पट आंबा ) हि महिषासुरमर्दिनी दुर्गा यांचेच हे प्रकट रूप आहे. देवीच्या समोर मंडपात चार खांब असून ते चारीही पुरुषार्थाचे अंग आहे.

जोतिबा मंदिराच्या सभोवती जोतिबाचे अष्टप्रधान म्हणजेच अष्टभैरव यांची स्थापना केलेली आढळते. यामध्ये काळभैरव, बाळ भैरव, सुवर्ण भैरव, गंड भैरव , आकाश भैरव, कल्पांत भैरव आहेत. अष्ट भैरवांशिवाय आदिनाथ, रामेश्वर, शंख भैरव आदी देवतांची स्थापना मंदिर परिसरात झाली आहे. जोतिबा मंदिर परिसरात हरिनारायणाचे लहान मंदिर आहे.

Sasan khati

काळभैरव

केदारनाथांच्या अवतार कार्यात काळभैरव यांनी अलौकिक व महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली म्हणून करवीर निवासिनी महालक्ष्मी यांनी भैरवसेनेच्या सरसेनापतिपदी त्यांची निवड केली. केदारनाथांनी अवतार धारण केल्यानंतर महालक्ष्मीच्या विनंतीवरून दक्षिण दिग्विजयी मोहिमेला प्रारंभ काशीतून केला. त्यावेळी श्री काळभैरवांनी या अलौकिक कार्यात सहभागी करून घेण्याची विनंती केली. केदारनाथांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य करून त्यांना दक्षिण मोहिमेत सहभागी करून घेतले. पुढे तोरण भैरव रत्नासुराला मिळाल्यानंतर महालक्ष्मीने केदारनाथांना काळभैरवांना भैरव सेनेचे सेनापती करावे, असे सुचविले. त्याप्रमाणे त्यांना भैरव सेनेचा सरसेनापती केले. काळभैरवाने आपल्या अलौकिक पराक्रमाने दक्षिण मोहीम यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलला. अनेक बलाढ्य राक्षसांचा नि:पात केला व त्या ठिकाणी तीर्थांची स्थापना केली.

काळभैरव हा शिवशंकराच्या अंशापासून उत्पन्न झालेला प्रखर व तेजस्वी अवतार आहे. काळभैरवाचे रूप मोठे लोभसवाणे आहे. चतुर्भुज मूर्ती, हातात त्रिशूल, डमरू, खड्ग व अमृतपात्र असून ते केदारनाथांप्रमाणे उभे आहेत. काळभैरव भैरवांचा नायक व रत्नागिरी पर्वताचा म्हणजे श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीचा क्षेत्रपाल व दंडकंधारी आहे. असा क्षेत्रपाल महाकाळ धुंडिराज काळभैरव या वाडी रत्नागिरीवर रक्षकरूपी वैभव असून या क्षेत्राचा अधिपती असल्याने नारळ वाढविण्याचा मान त्यांना दिला आहे.